Ad will apear here
Next
चौसष्ठ घरांचा नवा राजा
अभिमन्यू पुराणिकग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न बुद्धिबळातला प्रत्येक खेळाडू पाहतो; मात्र त्यात खूप कमी जण यशस्वी होताना दिसतात. पुण्याचा अभिमन्यू पुराणिक याने आपले हे स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्राचा सातवा, तर पुण्याचा तिसरा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिकबद्दल...
..............................
बुद्धिबळातील अभिजित कुंटे, अक्षयराज कोरे यांसारख्या नामांकित खेळाडूंना मागे टाकत अभिमन्यू पुराणिक याने सर्वांत कमी वयात ग्रँडमास्टर हा किताब मिळवला. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच अभिमन्यू पुण्यातील नामवंत प्रशिक्षक जयंत गोखले यांच्याकडे बुद्धिबळातील चक्रव्यूह भेदण्याचे धडे गिरवत होता. २६०१ एलो गुण मिळवत त्याने इतिहास रचला. ग्रीसमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा खेळ गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. क्रीडा क्षेत्रातील कोणताही वारसा नसताना त्याने मिळवलेल्या या यशामुळे त्याच्या कामगिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

अभिमन्यू सध्या जागतिक क्रमवारीत ३३व्या, आशियाई क्रमवारीत १३व्या आणि भारतीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. आजवर त्याने १००पेक्षा अधिक स्पर्धा जिंकल्या आहेत. बुद्धिबळाच्या क्षेत्रात पुण्याचे भूषण असलेल्या अभिमन्यूने बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश मिळवले आहे. २५००एलो रेटिंग गुणांचा टप्पा ओलांडून या १७ वर्षीय खेळाडूने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक तिसरा व अंतिम नॉर्म नुकताच पूर्ण केला.

अबूधाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अभिमन्यूने हा नॉर्म पूर्ण केला. ग्रँडमास्टर हा किताब पटकावणारा अभिमन्यू हा पुण्यातील तिसरा, राज्यातील सातवा, तर देशातील ४९वा बुद्धिबळपटू ठरला आहे. सात ग्रँडमास्टर, एका वूमन ग्रँडमास्टरसह अनेक मातब्बर प्रतिस्पर्ध्यांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत अभिमन्यूला ३७वे मानांकन होते. या स्पर्धेआधी त्याच्या खात्यावर २४९५ एलो रेटिंग गुण जमा होते.  ग्रँडमास्टरच्या किताबासाठी त्याला केवळ पाच गुणांची आवश्यकता होती. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत सातव्या फेरीत अभिमन्यूने इंडिक अलेक्झांडरचे आव्हान साडेपाच तासांच्या लढतीनंतर परतवून लावले. १२७व्या चालीअखेर अलेक्झांडरने पराभव मान्य केला. आठव्या फेरीत ग्रँडमास्टर पी. लुका याला रोखण्यासाठी अभिमन्यूला बराच संघर्ष करावा लागला; मात्र ही लढत बरोबरीत सोडवून त्याने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक गुणांचा टप्पा ओलांडला. स्पर्धेअखेर त्याचे रेटिंग गुण २५१० इतके झाले. या स्पर्धेत अभिमन्यू ५.५ गुणांसह ११व्या स्थानी राहिला. 

अभिमन्यू १० वर्षांपासून ‘फिडे’चे (फेडरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स) मान्यताप्राप्त प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून, तो सिम्बायोसिसमध्ये बारावीत शिकत आहे. सरावासाठी महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे, चिन्मय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय मास्टर समीर काठमाळे, राकेश कुलकर्णी, महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामिनाथन, अनिरुद्ध देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख अभिमन्यू आवर्जून करतो.

महाराष्ट्रातील तो सर्वांत युवा ग्रँडमास्टर आहे. या प्रकारचा विक्रम पूर्वी गुजरातच्या विद्याधर याने वयाच्या अठराव्या वर्षी केला होता. स्विस लीग स्पर्धेत अभिमन्यूने सात ग्रँडमास्टर, एक महिला ग्रँडमास्टर आणि एक महिला आंतरराष्ट्रीय मास्टरशी सामना केला. अभिमन्यूने ५.५ गुणांसह तिसरे अंतिम सर्वसाधारण मानांकन मिळविण्यासाठी २६०१ गुणांची कमाई केली.

अभिमन्यू वाणिज्य शाखेत शिकत असून, प्राचार्य सोमण सर आणि उपप्राचार्य बेलसरे मॅडम यांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. जीएम आर. बी. रमेश, जीएम चुचेलोव, जीएम अमानोतोव्ह, आयएम शरद टिळक यांच्यासह विविध प्रशिक्षण शिबिरांमध्येही त्याने भाग घेतला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अभिमन्यूला पाठबळ दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्राधिकरणाने त्याला शिष्यवृत्ती दिली आहे. अभिमन्यूने त्याला मिळालेला ग्रँडमास्टर किताब आपल्या पालकांना समर्पित केला आहे. 

अबूधाबीतील ग्रँड मास्टरसाठीच्या स्पर्धेत अभिमन्यूने पहिल्या फेरीत प्रत्युषा बोडावर मात करत धडाक्यात सुरुवात केली. दुसऱ्या फेरीत आणि तिसऱ्या फेरीत मात्र त्याला अनुक्रमे कोरोबोव अँटन व लुपूलेस्कू यांच्याशी बरोबरीवर समाधान मानावे लागले. चौथ्या फेरीत गुशीओबिंग याच्यावर मात करत त्याने पांचवी फेरी गाठली. सहाव्या आणि सातव्या फेरीतही त्याला अनुक्रमे विरिदोव व्हेलेरी आणि इदानी पौया यांच्याशी बरोबरी मान्य करावी लागली. सातव्या फेरीत मात्र त्याने इंडिक आलेक्झांडर याच्यावर मात करत आठवी फेरी गाठताना आपला ग्रँडमास्टरचा नॉर्म निश्चित केला. आठव्या फेरीत पाइचॅदझेक लुका याच्याशी त्याने बरोबरी केली आणि २६०१ एलो गुण कमावले. नवव्या फेरीत मात्र त्याला पॉलिग्रास मिर्सीकडून पराभवाचा धक्का बसला.  

शहराचा तिसराच ग्रँडमास्टर बनलेला असताना आता अभिमन्यूवर सातत्यपूर्ण कामगिरीची जबाबदारी आली आहे. अभिजित कुंटे याने जसा बुद्धिबळ क्षेत्राचे नावलौकिक वाढवले, तसाच अभिमन्यूला तो वारसा पुढे न्यायचा आहे.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZSWBU
Similar Posts
बुद्धिबळातील नवी गुणवत्ता - सलोनी सापळे पुण्याच्या बुद्धिबळ क्षेत्राला प्रकाशझोतात आणणाऱ्या ग्रँडमास्टर अभिजित कुंटेला आदर्श मानत आज हजारो मुले-मुली या खेळात यशस्वी वाटचाल करत आहेत. अभिजितची ही धुरा पुढे नेत पुण्याच्या सलोनी सापळे हिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’चा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळवून पुण्याचे नाव आणखी उंचावर नेण्याची कामगिरी केली आहे
‘वुमन ग्रँडमास्टर’ होण्याची ‘आकांक्षा’ बुद्धिबळातल्या चौसष्ट घरांचे आकर्षण आकांक्षाला लहानपणापासूनच होते. याच ओढीने वयाच्या सातव्या वर्षापासून ती बुद्धिबळाचे प्राथमिक धडे गिरवू लागली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोळा वर्षांखालील स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणेबद्दलचा
उत्कृष्ट फुटबॉलपटू घडवणारा परेश... फुटबॉलमध्ये परेश शिवलकर हे नाव केवळ पुण्यातच नाही, तर राज्य पातळीवरदेखील आता नवीन राहिलेले नाही. एक फुटबॉलपटू म्हणून जितकी अविस्मरणीय कारकीर्द त्याने गाजवली आहे, तेवढाच आज एक प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी ठरत आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक परेश शिवलकरबद्दल...
वेगाची नवी राणी : ताई बामणे नाशिकची नवोदित धावपटू ताई बामणे हिने युवा ऑलिंपिकला पात्र ठरत भारताची नवी वेगाची राणी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या युवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली असून बँकॉक येथे झालेल्या पात्रता फेरीत तिने पंधराशे मीटर अंतराच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले आणि युवा ऑलिंपिकची पात्रता मिळवली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language